विशाल पट्टे सतेल, तांबुस,
जरा सैल अन् मऊ, कातडी;
सिलिंडरावर गर्गर् फिरती
किति वेगाने ! —जणू सालडीं
काळाचीं जीं प्रकाश कातित
गिरगिरती ह्या पृथ्वीभवती.
चकाकणारे अब्लख पिस्टन
हिस्के घेती मारित मिटक्या
संज्ञेवाचुन संभोगाची
अशीच कसरत असते हलक्या.
मधेच कोठे दर्शक-यंत्र
सुईमारतें अस्थिरतेची.
अवीट चक्रे बाहुपाश हे
दातादातांतुनी गोवती;
पेरूवाणी, बोरांवाणी;
बटण दाबतां, उडून जाती
बल्ब नि ठिपके हिरवे-लाल,
फूलपांखरे जणू इराणी!
पहा, पहा ही एकतानता
तांबट-पितळी सृष्टीची ह्या