"देवाजीने करुणा केली, भातें पिकुनी पिवळी झाली."

By admin, 29 December, 2023

"देवाजीने करुणा केली,
भातें पिकुनी पिवळी झाली."

देवाजीने करुणा केली,
सकाळ नित्याची ही आली
जणु पायाने चित्त्याच्या अन्
रस्ता झाडी झाडूवाली.

घराघरांतिल चूल पेटली;
चहा उकळुनी काळा झाला;
जरा चढवितां दुसरें भांडें
भातहि शिजुनी होइल पिवळा.

देवाजीने करुणा केली :
रोजचीच पण 'बस'ही आली
जणु पायाने हरिणीच्या अन्
शिरस्त्यांतली कामे झाली.

घरी परततां, भाजीवाली
समोर दिसली, भरली थैली;
दो दिडक्यांची कडू दोडकीं
जरी पिकूनी झाली पिवळीं.

उजाडतां जे उजाड झालें,
झोपीं गेलें मावळतां तें :
करील जर का करुणा देव
बिचकुनी होतिल हिरवीं भातें !

कवितासंग्रह

  • admin