१९४७

प्रकाशनवर्ष

By admin, 30 December, 2023

तुझ्याच आलों डोळ्यांदेखत;
असाच पडलों येथे खितपत;
जन्माचें जें माझें घेणें,
वसूल होइल केव्हा, कितपत !

By admin, 30 December, 2023

काळ्या बंबाळ अंधारीं
धपापतें हें इंजिन;
कुट्ट पिवळ्या पहाट
आरवतो दैनंदिन
भोंगा.—
"घनःश्यामसुंदरा श्रीधरा गिरिणोदय झाला,
उठि लवकरि दिनपाळी…"
—गोंगाटला सारा
कामगारवृंद आणि
कोंबटशा पिळी धारा
यंत्रावर चक्रपाणि
घामाघूम.—

"कुत्रापि पतितं तोयं यथा गच्छति सागरम्
सर्वचक्रभ्रमस्कारं मालकं प्रति गच्छति."

—काळें पुच्छ
लपवुनी पायीं, गर्द
इथे वस्तीत गलिच्छ
भों भों भुंके लालजर्द
संध्याकाळ.

"शुभं करोति कल्याणं दारिद्र्यं ऋण-संपही
शुद्धबुद्धिविनाशाय भोंगाकुत्री नमोऽस्तु ते."

By admin, 29 December, 2023

गोंधळलेल्या अन् चिंचोळ्या
गिरगावांतिल गल्लीमध्ये
चिमण्या अंधाराचें चाले
पुसट प्रबोधन-

"उघडि नयन रम्य मिशा पुसत पुसत आली,
अरुणवरणमय मलई मनि मांजर..........

-खाईमध्ये

संसाराच्या, निबरट किरटीं
हाडबंडले अशा बायका
उष्टीभांडी उरकुन बसल्या
विणीत चिमणें जीवन-
"डोळे हे फिल्मि गडे, खोकुन मज पाहुं नका !
काढूं मी दळणा कशि, निवडुं सख्या, आणि मका !"

-ऐका :

कुल्फीमलईवाला आला;
तसाच ढकलित चिमट बाटल्या
जास्वंदी अन् नारिंगी पण
-हाताळुनि ज्या काळ्या झाल्या-
सरबतवाला.-

By admin, 29 December, 2023

पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी,
तरी पंपतो कुणि काळोख ;
हसण्याचें जरि वेड लागलें,
भुंकतात तरि अश्रू चोख.

फत्कन् बसली रबरी रात्र;
दुजी न टायर ह्या अवकाशीं;
राठ मनाच्या चाटित बसलीं
पापुद्र्यांच्या कुत्रीं राशी.

खांद्यावरती न्यावी रात्र
जमेल ज्याला त्याने त्याने;
डोळ्यांवरती जरा कातडें
ओढावें, -पण हसतमुखाने.
पंक्चरलेल्या रबरी रात्री
गुरगुरवावीं रबरी कुत्रीं !!

By admin, 29 December, 2023

आलो क्षणिचा विसावा म्हणून;
टेकले पाय :
तो तूंच हटकलेंस ‘कोण ?’ म्हणून.
आणि मनांतले शिणलेले हेतू
शेण झाले.

By admin, 29 December, 2023

उगीचता वेंधळी कोंबते
काळाच्या पिशवीत झावळ्या;
जिथे पिकावा नारळ तेथे
टोपलीत कुणि भरी मासळ्या.

गळ्यागळ्यांतुन सूर उसळतो,
उरांत लटके उलटें वाघुळ;
खळीखळींतुन हसतो गाल,
कवटिंत उगवे खुरटा बाभुळ.

परिस्थितीचें पिऊन ॲसिड
लिबलिबलीं हीं मनें हडकुळीं;
लागतील रे कधी तरी का
यांवरही तव नारळ- बकुळी !

By admin, 29 December, 2023

पिचे अंधार पोकळ,
गहिवर येई काळा;
गालीं वाळला ओघळ,
दहिवर झाले गोळा.

तुझ्या भुरक्या केसांचे
वळ माझ्या गालावर,
माझ्या ढिल्याशा बोटांचे
तळ तुझ्या स्तनावर.

सोडवेना सोडवीतां
गेल्या रात्रींचा हा पाश;
जागा आहें तरी आता
मेल्या इच्छा सावकाश.

By admin, 29 December, 2023

कणा मोडला निश्चलतेचा
ह्या पालीच्या आवाजाने;
'धम्मं सरणम्' कुणी बोललें
पाषाणांतिल बुद्ध-मिषाने.

सरणावरती सरण लागलें,
जिवंत आशा पडे उताणी;
गया गोपिचा उतरे राजा.
'सुटला', म्हणती सारे, 'प्राणी' !

शब्द टराटर फाडुनि टाकी
सांगायाचें म्हणजे ओठी
तसेंच राहिल माझ्या अगदी-
पूर्ण नागडें, पूर्ण नागडें !

By admin, 29 December, 2023

त्रुटित जीवनीं सुटी कल्पना,
ट्रिंग ट्रिंग जैसा खोटा नंबर
सलग जमेना एक भावना,
'हलो हलो'ला हलकट उत्तर.

सभोवताली घरघर चालें,
वरवर आशा जगण्याचीही;
कुणी न मरती मात्र येथले,

ट्रिंगल अमुची करितो यमही
यम् यम् पश्यसि त्याचा फासा
जुळवुन देइल खोटा नंबर :

ब्रुवन्ति सारे घे कानोसा :
"मरणारांचे जगणे खंबिर !"

By admin, 29 December, 2023

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो;
होता पायांतही वारा
कालपरवापावेतो.

आज टपोरलें पोट,
जैसी मोगरीची कळी;
पडे कुशींतून पायीं
छोट्या जीवाची साखळी.

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो;
थांब उद्यांचे माउली,
तीर्थ पायांचें घेईतो.

  • admin