१९४७

प्रकाशनवर्ष

By admin, 29 December, 2023

फिरतां पिसाट पिसाट । अंतरिक्षी या अफाट
ग्रहमालेचें चऱ्हाट । सूर्य फेकी ॥

अवकाशीं पडे पीळ । गाठीगाठीत घननीळ,
जमती आसावरी रीळ । जडत्वाचे ॥

उकलाया सूत्रबद्ध गाठी । आमुच्या बुद्धीसी वेठी
कासया धरिलेंस जगजेठी | सर्वसाक्षी ॥

जरी आत्मविश्वास आम्हां । आणि सत्याचाही पान्हा,
तरी ढोरांचाच कान्हा । शेवटीं तूं ! ॥

By admin, 29 December, 2023

कां हो माजवितां दुही । माखतां स्वातंत्र्याची वही
स्वजनरक्ताने प्रत्यहीँ । लळथळां ॥

गातां धर्माचे पवाडे । उघडी झालेलीं कवाडें
दाविती अब्रूची की हाडें । टांगलेलीं ॥

अरे हिंदू - मुसलमान । प्राण देशावरी कुर्बान;
परी यादवी ही लांछन । अल्ला-रामां ॥

जो जो उठे तो तो नेता । मारी लंब्याचवड्या बाता;
परि हुल्लडीचा नियंता । कोणी नाही ॥

शब्दशूर वाचीवीर । ऐसे पुढारी थोर थोर,
जयीं प्रेतांचा बाजार । बोलवीला ॥

केला धर्माचा लिलाव । बुरखेवाली सत्ता-हाव,
येथे तुम्हां आम्हां राव । मात्र मौत ॥

By admin, 29 December, 2023

न्हालेल्या जणुं गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरिचें उजळित येई
माघामधली प्रभात सुंदर.
सचेतनांचा हुरूप शीतल;
अचेतनांचा वास कोवळा;
हवेंत जाती मिसळुनि दोन्ही.
पितात सारे गोड हिवाळा !

By admin, 29 December, 2023

वावडी वाह्यात माझी ! पोकळीचा पिंजरा !
सोड दोरी, जाउं दे ह्या कागदाच्या पाखरा !

ओळखीच्या द्या ढगांचा रंग गेला गंजुनी,
ओतलेल्या ह्या नसांचा ढंग तेवी पिंजुनी
देठ-बेंबीचा कुठे का सांधतो फांदी-फुलां !
गेंद येतो तारकांचा आवसेच्या रात्रिला.

फाळ भंगे नांगराचा, शेत ओकी ढेकळां,
आणि माझ्या मायबापा, तूंहि खुपशी या गळां.
कातणीच्या जेवि पोटीं लक्ष अंडी पोसती,
पोकळीच्या आत तेवी लाख वाती तेवती.

टाळुनीया त्यांस जाण्या आकसे ही वावडी,
सोड दोरी देवबाप्पा; वाळली हीं आतडी
सोड दोरी, जाउं दे रे !काळ लोम्बई या घडीं.

By admin, 29 December, 2023

हाडांचे सापळे हासती
झडणाऱ्या मांसास पाहुनी;
किती लपविलें तरी शेवटी
दातांचं दिसणारच पाणी.

पहा विचारूनि त्यांना कसली
मैथुनांत रे असते झिंग;
दाखवितिल ते भोक रिकामें
जिथे असावें मांसल लिंग.

पहा टाकुनी प्रश्न काय वा
निशाण तुमच्या हो बुद्धीचें;
घुमेल डमरूंतुन डोक्यांच्या
हास्य वाळलेल्या मज्जांचें.

अखेर होतां, किती विशाल
पुसेल कुणि जर त्यांचें अंगण;
दिसेल थोडें सफेद कांही,
जिथे असावें मांसल ढुंगण.

अरसिक भोळ्या कुठे भैरवा,
उघड तुझे तर तिनही डोळे;
भस्म करी गा अता तरी हे-
हे हाडांचे खडे सापळे !

By admin, 29 December, 2023

बोंड कपाशीचें फुटे,
उले वेचतांना ऊर;
आज होईल का गोड
माझ्या हातची भाकर !

भरे भुइमूग-दाणा,
उपटतां स्तन हाले;
आज येतील का मोड
माझ्या वालांना चांगले !

वांगी झाली काळीं-निळीं,
कांटा बोचे काढतांना;
आज होतील का खुशी
माणसं ग जेवतांना !

By admin, 29 December, 2023

किती वितींचे जीवन माझें
तुलाच ठावें, सदारंग तूं;
किती शितांची माझी भूक
ओरबाडते आंतिल किंतू.

होते-आहे-होईल यांतुन
वीज वाहते होण्याचीच
ह्या स्नायूंच्या तारांचा रे,
तुझ्याच हाताखाली स्वीच.

पुरेल मजला स्थिर वाटोळ्या
तेजाचा बघ असा जरी क्षण
मेल्याविण जैं जळतिल तारा
तरारतिल अन् स्नायूंचे कण !

By admin, 29 December, 2023

कुठे तरी केव्हा तरी
जातें असें हें चुकून,
आणि तवंगतो जीव
बिना रंग, बिना ऊन.

मग दिसे खरी घाण :
कारखान्यांतील तेल
आलें होऊनी निचरा
पाण्यावर टाकींतील.

तेल पाण्यांत जिरावें;
पाय बुडावें संज्ञेत;
हें तो अशक्य अशक्य
विज्ञानाच्याही भाषेत !

By admin, 29 December, 2023

फस्फसून येतो सोड्यावरती गार
हा तुषार-केसर फेसगेंद अलवार;
हुंगीत तयाची खारट मादकता ही
कुणि करितो ओले ओठ इथे मध्यान्हीं;

घाशीत कंठतो काळ मनांतिल खरडे
फुंकीत धुराचें एकलकोंडें कोडें;
तों हळूच येई रांगत फाल्गुन-वारा,
अन् गळती वेफर झाडावरुनि भरारा;

परि खिशांत जातां चवलीसाठी हात
राहती मनांतिल वेफर हाय मनांत !
—गुर्मीत इराणी खप्न पाहतो ऐसें
स्वप्नांतहि स्मरतो सोड्याचे पै-पैसे.

—अशीच होती नक्टी एक,
उलटे केस नि तिरप्या भिवया;
मुरकत दावी उरोज उन्नत,
ढेपा जैशा तेल्याघरच्या.

By admin, 29 December, 2023

नाहीं शोधिलें गावाला,
नाहीं विचारलें नांव;
फक्त चालत रस्त्याने
केला स्वतःचा लिलाव.

किती मनांतलीं पापें
केली रस्त्यांत गा देवा;
किती हासडल्या शिव्या
तुला, करुनी कांगावा.

पावसाळे आले गेले;
दोन युद्धं जमा झाली;
रस्त्याकडां वीजबत्ती
कितीकदा आली गेली.

मनांतल्या पातकांचे
होती क्रिस्टल तयार;
आणि अजून शेलकी
आहे शिवी जिभेवर,

— हेचि दान देगा देवा
गळू नेदि नेदि जिव्हा !

  • admin