कां हो माजवितां दुही

By admin, 29 December, 2023

कां हो माजवितां दुही । माखतां स्वातंत्र्याची वही
स्वजनरक्ताने प्रत्यहीँ । लळथळां ॥

गातां धर्माचे पवाडे । उघडी झालेलीं कवाडें
दाविती अब्रूची की हाडें । टांगलेलीं ॥

अरे हिंदू - मुसलमान । प्राण देशावरी कुर्बान;
परी यादवी ही लांछन । अल्ला-रामां ॥

जो जो उठे तो तो नेता । मारी लंब्याचवड्या बाता;
परि हुल्लडीचा नियंता । कोणी नाही ॥

शब्दशूर वाचीवीर । ऐसे पुढारी थोर थोर,
जयीं प्रेतांचा बाजार । बोलवीला ॥

केला धर्माचा लिलाव । बुरखेवाली सत्ता-हाव,
येथे तुम्हां आम्हां राव । मात्र मौत ॥

जे जे म्हणविती पुढारी । वेळ येतां देती तुरी;
सुरा पाठींत, छर्रा उरी । तुम्हां आम्हां ॥

बोला अल्ला है राम । करा पैगंबरा प्रणाम;
आहे तुम्हां आम्हां हराम । बंधुद्वेष ॥

कुठे गया, कुठे मक्का । हत्याकांड येथे फुका;
भुकेकंगालिस्तान का । झिंदाबाद ? ॥

कवितासंग्रह

  • admin