फस्फसून येतो सोड्यावरती गार

By admin, 29 December, 2023

फस्फसून येतो सोड्यावरती गार
हा तुषार-केसर फेसगेंद अलवार;
हुंगीत तयाची खारट मादकता ही
कुणि करितो ओले ओठ इथे मध्यान्हीं;

घाशीत कंठतो काळ मनांतिल खरडे
फुंकीत धुराचें एकलकोंडें कोडें;
तों हळूच येई रांगत फाल्गुन-वारा,
अन् गळती वेफर झाडावरुनि भरारा;

परि खिशांत जातां चवलीसाठी हात
राहती मनांतिल वेफर हाय मनांत !
—गुर्मीत इराणी खप्न पाहतो ऐसें
स्वप्नांतहि स्मरतो सोड्याचे पै-पैसे.

—अशीच होती नक्टी एक,
उलटे केस नि तिरप्या भिवया;
मुरकत दावी उरोज उन्नत,
ढेपा जैशा तेल्याघरच्या.

काय हलाखी स्त्रीत्वाची ही;
माणुसकीचें काय विडंबन !
भोगशून्य करि भोगव्यथेचें
लिंग-गंड प्रच्छन्न प्रदर्शन !

कवितासंग्रह

  • admin