हाडांचे सापळे हासती

By admin, 29 December, 2023

हाडांचे सापळे हासती
झडणाऱ्या मांसास पाहुनी;
किती लपविलें तरी शेवटी
दातांचं दिसणारच पाणी.

पहा विचारूनि त्यांना कसली
मैथुनांत रे असते झिंग;
दाखवितिल ते भोक रिकामें
जिथे असावें मांसल लिंग.

पहा टाकुनी प्रश्न काय वा
निशाण तुमच्या हो बुद्धीचें;
घुमेल डमरूंतुन डोक्यांच्या
हास्य वाळलेल्या मज्जांचें.

अखेर होतां, किती विशाल
पुसेल कुणि जर त्यांचें अंगण;
दिसेल थोडें सफेद कांही,
जिथे असावें मांसल ढुंगण.

अरसिक भोळ्या कुठे भैरवा,
उघड तुझे तर तिनही डोळे;
भस्म करी गा अता तरी हे-
हे हाडांचे खडे सापळे !

कवितासंग्रह

  • admin