नाहीं शोधिलें गावाला,
नाहीं विचारलें नांव;
फक्त चालत रस्त्याने
केला स्वतःचा लिलाव.
किती मनांतलीं पापें
केली रस्त्यांत गा देवा;
किती हासडल्या शिव्या
तुला, करुनी कांगावा.
पावसाळे आले गेले;
दोन युद्धं जमा झाली;
रस्त्याकडां वीजबत्ती
कितीकदा आली गेली.
मनांतल्या पातकांचे
होती क्रिस्टल तयार;
आणि अजून शेलकी
आहे शिवी जिभेवर,
— हेचि दान देगा देवा
गळू नेदि नेदि जिव्हा !