गोंधळलेल्या अन् चिंचोळ्या
गिरगावांतिल गल्लीमध्ये
चिमण्या अंधाराचें चाले
पुसट प्रबोधन-
"उघडि नयन रम्य मिशा पुसत पुसत आली,
अरुणवरणमय मलई मनि मांजर..........
-खाईमध्ये
संसाराच्या, निबरट किरटीं
हाडबंडले अशा बायका
उष्टीभांडी उरकुन बसल्या
विणीत चिमणें जीवन-
"डोळे हे फिल्मि गडे, खोकुन मज पाहुं नका !
काढूं मी दळणा कशि, निवडुं सख्या, आणि मका !"
-ऐका :
कुल्फीमलईवाला आला;
तसाच ढकलित चिमट बाटल्या
जास्वंदी अन् नारिंगी पण
-हाताळुनि ज्या काळ्या झाल्या-
सरबतवाला.-
"अजुनि चालतोंच वाट माल हा खपेना;
विश्रांति-स्तन कोठे घ्यायचा..."
- गिरगावांत
गलबत काळोखाचें पेरी
नांगर चिमणा असाच अपुला.