काळ्या बंबाळ अंधारीं
धपापतें हें इंजिन;
कुट्ट पिवळ्या पहाट
आरवतो दैनंदिन
भोंगा.—
"घनःश्यामसुंदरा श्रीधरा गिरिणोदय झाला,
उठि लवकरि दिनपाळी…"
—गोंगाटला सारा
कामगारवृंद आणि
कोंबटशा पिळी धारा
यंत्रावर चक्रपाणि
घामाघूम.—
"कुत्रापि पतितं तोयं यथा गच्छति सागरम्
सर्वचक्रभ्रमस्कारं मालकं प्रति गच्छति."
—काळें पुच्छ
लपवुनी पायीं, गर्द
इथे वस्तीत गलिच्छ
भों भों भुंके लालजर्द
संध्याकाळ.
"शुभं करोति कल्याणं दारिद्र्यं ऋण-संपही
शुद्धबुद्धिविनाशाय भोंगाकुत्री नमोऽस्तु ते."