त्रुटित जीवनीं सुटी कल्पना,
ट्रिंग ट्रिंग जैसा खोटा नंबर
सलग जमेना एक भावना,
'हलो हलो'ला हलकट उत्तर.
सभोवताली घरघर चालें,
वरवर आशा जगण्याचीही;
कुणी न मरती मात्र येथले,
ट्रिंगल अमुची करितो यमही
यम् यम् पश्यसि त्याचा फासा
जुळवुन देइल खोटा नंबर :
ब्रुवन्ति सारे घे कानोसा :
"मरणारांचे जगणे खंबिर !"