अजून येतो वास फुलांना,
अजून माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
अजून बकरी पाला खाते.
अस्मानावर भगवा रंग
आणि नागवें समोर पोर;
अजून डुलक्या घेत मोजतें
ह्या दोहोंतिल अंतर ढोर.
भूकंपाचा इकडे धक्का
पलीकडे अन् युद्ध-नगारे;
चहूंकडे अन् एकच गिल्ला,
जुन्या शवांवर नवे निखारे.
फत्तरांतला देव पाहतो
कुठे जहाली माझी फत्ते;
माणुस म्हणतो चिरंतनाचे
मनांत माझ्या अस्सल कित्ते.
चढेल तुसडीं तेढी नातीं,
नश्वरतेंतहि चिरका नखरा;
शिजत्या मांसामधून कोणी
स्वर्ग हुंगतो बुलंद बहिरा.
सटीक मानवतेची टिपणी
पुन्हा वाचली अर्थ तोच तरि;
आभाळाच्या पल्याड स्पंदन
टिपरी त्याची ह्या मडक्यांवरि.
जगून थोडें अखेर मरणें
उघडझाप ही डोळ्यांचीच;
अंधारांतून राडाराचा
किरण चालला सरत पुढेच.
कार्तिकांतलें गव्हाळ ऊन
जरी मनाची अशा रितीने
फाडूनि बघतें ढिली कातडी
जखम आतली जुन्या भितीने;
तरीहि येतो वास फुलांना,
तरीहि माती लाल चमकते;
खुरट्या बुंध्यावरी चढून
तरीहि बकरी पाला खाते;
अस्मानावर भगवा रंग
आणि नागवें समोर पोर
तरीहि डुलक्या घेत मोजतें
ह्या दोहोंतिल अंतर ढोर!
-"अहो बत महद्भाग्यं द्रष्टुं व्यवसिता वयम्"-