दणकट दंडस्नायू जैसे

By admin, 29 December, 2023

दणकट दंडस्नायू जैसे
लोखंडाचे वळले नाग;
कभिन्न काळ्या मांड्या जैसा
पोलादाचा चिरला साग.

धगधगणाऱ्या भट्टीपुढल्या
प्रकाशांत ही तळपे कांती,
जशी ओलसर शिसवी नक्षी
पॉलिशलेली चांदण्यांत ती.

टणक् कोळसा पवित्र्यांत हा
खोरुनि घेई पावड्यांत अन्
झोकुन देई पहा लीलया
तसाच भट्टित अचूक झर्कन्.

आणि फुरफुरे भट्टी जैसी हले
सावली प्रकाश तैसा;
भालावरला रुमाल शुभ्र
जिरवुन घेई घाम जरासा.

यंत्रयुगात नवनृत्याचा
स्थाणुभाव हा प्रगटे येथे
मनोज्ञ मुद्रा शिल्पित एक
संगमरवरी मांसामध्ये,

-अहा, कोळसेवाला काळा !
नव्या मनूंतिल गिरिधर-पुतळा !!

कवितासंग्रह

  • admin