ओहोटीच्या काठावर
वास येई खरपूस;
जैसा अर्भक-मेंदूत
कच्च्या चिंचांचा पाऊस.
ओक्या लाटांवर एक
बुडे उडे हें ओंडकें;
तारुण्याच्या कल्पनांत
जैसें वेतांचें पुडकें.
आणि घाबरला फेस
कवटाळी खडकाला;
जैशी मरणाची खात्री
म्हाताऱ्याच्या उत्साहाला.
-आम्हा मानवांची पुंगी
साद देते क्षितिजाला;
काढी सागराचा भंगी
घाण मात्र या काठाला !