जगाचा लिप्ताळा । नाही, किंवा भोळा;
तुझ्या परिमळा । मुकलों पैं ॥
एकला असून । मनीं दोन झालों,
आता मात्र भ्यालों । मला मीच ॥
नाहीं मी उदास । विपन्न, विरक्त;
नाहीं तैसा भक्त । ऐहिकाचा ॥
माथां केव्हा गोणी । बाची कधी नाम;
देऊळ, गुदाम | दोन्ही भाग्यीं ॥
कितीक दालनें । धुंडाळीत आलों;
उत्कंठा ही ल्यालों । स्वप्नांतली ॥
आशेचीच बात । आशेचेंच तूप;
जळतें स्वरूप । निराशेचें ॥
चिंतेवीण चिंता । आशेवीण आशा,
साद्यंत तमाशा । रंगवीन ॥
येईल पडदा । हळूहळू खाली;
विदूषका वाली । हास्यरस ! ॥