आहे बुद्धीशीं इमान । जाणें विज्ञानची ज्ञान;

By admin, 29 December, 2023

आहे बुद्धीशीं इमान । जाणें विज्ञानची ज्ञान;
परि कोठे तरी आन | ताण पडे ॥

जाणें भांडवली वृत्ती । नष्टचर्य पिकवी चित्तीं;
आणि कामगारा हातीं । करवंटीच ॥

जाणें शुद्ध शुचिर्भूत । एक प्रायोगिक सत्य,
जरी त्याचेंच अपत्य । हिरोशिमा ॥

येथ शब्द नाही विज्ञाना। हें अवघें मानव्याविना,
नरमेध वाटे नरांना । धन्य जेथे ॥

जाणें आसक्ती-विरक्ती । स्वार्थ परमार्थाच्या पंक्ती,
स्वच्छंदता आणि सक्ती । मिथ्या भाषा ॥

जाणें हें सर्व सर्व सर्व । नुरे जाणण्याचाही गर्व;
मतामतांचे निखर्व । मोजिले म्यां ॥

आली बेरीज शून्याची । उणें चाड अन्यायाची,
भागा वाण माणुसकीची । गुणा दंभें ॥

सांगा सांगा हो, उत्तर । अजुनी ना शून्याकार;
मग लावा अट्केपार । चीड-झेंडे ॥

कवितासंग्रह

  • admin