चालला हा बंदिवान

By admin, 29 December, 2023

चालला हा बंदिवान । गाडा हाकी गाडिवान;
कुणी सूटबूटी ज्वान । अधिकारी ॥

शुभ्र खादीबंद शेट । जया हिंसाधर्म-वीट,
युद्ध-साहित्य-कंत्राट । घेण्या उभा ॥

नील गणवेषी हा खडी । गस्त घाली 'पीली पगडी';
वणिग् सहजगत्या वाकडी । दांडी मारी ॥

काळा कोट, काळा टाय । त्याचा कोर्टाकडे पाय;
बाराबंदीत घेई 'चाय' । खेडूत हा ॥

यंत्रा तेल मेकॅनिक । देत मळक्या वस्त्री एक;
अंगणी काढी स्वस्तिक । रूपलेखा ॥

तलम पारदर्शी वसनीं । ढेरपोट्या दे ताणुनी;
आंधळा लक्तराभरणी । चाचपडे ॥

ऐसे इतरही अगम्य । ज्यांचे मिळून जीवारण्य
देई विश्वदर्शनाचें पुण्य । चिन्हमात्रें ॥

सर्व वदनांवरी धूर । पहा त्यांतून खेळे नूर
वैवस्वती, जैसा सूर । आट्यापाट्या ॥

माझी आर्तते फिर्याद । कैसी यमाची अवलाद
दिसेल ही होतां बाद। पाटीवर ॥

कवितासंग्रह

  • admin