केलें जन्मापासूनि रान । आपुल्या जिवाचें जाणुन,
वाटलें की काळोखांतून । येशील तूं ॥
नाही उठलों जगांतून । उचविलीं अंडीं ना बसून,
म्हणूनी ब्रह्मांडी का रुसून । बैसलास ? ॥
झाली ताटातूट कैशी । केव्हा आणि कोठे, मजसी
कांहीच नुरलें स्मृतिशेषीं । कृपावंता ॥
मात्र जैसें की पाखरां । झाडावरून येतां वारा,
मज अज्ञाताचा फवारा । बिलगे तसा ॥
मग उडती शब्द- पिसें । हृत्पंखांतले जे ससे,
ज्यां ज्ञात गोफणीसरसें । खाली आणी ॥
ज्ञाताज्ञाताची काचणी । सर्व बोलती की ही फणी;
इयें संज्ञाशक्ति का कुणी । विंचरावी ! ॥
माझ्या अंतरीं अपाप । दाटते काळोखाची वाफ,
जियें हाक-शिट्टी साफ । किंचाळते ॥
कळ लागते गा येथेही । बाष्पीभूत संज्ञा पाही,
काळोखांतून काळोखीं । जाण्याहि ये ! ॥