बडवीत टिर्ऱ्या । अर्धपोट किंवा
ओंगळ देखावा । दाखवीत ॥
भिक्षा मागे रोज । एवढासा पोर,
आई ती लाचार । पाठीमागे ॥
शेठ सावकार । मीही शरमिंदा
मानव्य-मिलिंदा । पैसा देतों ॥
होउनिया नंगे । पोटा घास घ्यावा,
आम्हीही तो द्यावा । हलाखी ही ॥
सत्याचें सुपीक । विश्वांतून वेचूं,
प्रयोगांत खेचूं । परमाणू ॥
अधिकार ऐसा । मिळविला आम्ही;
आमुच्याच धामीं । नाठाळ कां ? ॥
सत्तेचेंच तूप । सत्तेचीच पोळी,
मानव्याची होळी | भाजाया ती ॥
देवा, ऐशी भूक । कासया दिलीस ?
झालों कासावीस । मीही नंगा ॥
नंग्यांचाच आता । येथे कारभार
कोंडी आरपार । फोडाया ही ॥
टिर्ऱ्या अर्धपोट । जोवरी आहेत,
ओंगळ समस्त । आम्ही नंगे ! ॥