शिवलिंग माझे लिंग । हेंच अशांतीचे बिंग,

By admin, 29 December, 2023

शिवलिंग माझे लिंग । हेंच अशांतीचे बिंग,
ज्यांच्या झुंजे संज्ञारिंग । व्यापिलें गा ॥

दोन्ही खवीस खमंग । एक अंगातला अनंग,
दुजा निर्गुणाचा ढंग । झटपटी ॥

एका शब्दाचा आधार । दुजा शरीरांत तर्र,
मध्ये लुंगासुंगा फकीर । मीच मात्र ॥

एक मांडी ‘काल’-बाजार। दुजा ‘उद्या’ दे उधार,
माझा 'आज'चा व्यापार । अगतिक ॥

जैसे विमानाचे पंख । फडफडल्याविनाही डंख
मारितां हवेस, शंख । हवा करी ॥

तैसें ज्ञान आणि वासना । दृश्य प्रदर्शनाविना
दंश करितां मन्मना । ओरडें तें ॥

वासनेंतून व्हावें ज्ञान । ब्रह्मज्ञानीं विषयसेवन
का मिथ्या जगीं मिथ्या भान । अशांतीचें ? ॥

चालणें ही अशीच । मर्त्यांश-अमर्त्यांश-खेच,
जो जिवंत सृष्टीचा पेच । तोच पाया! ॥

कवितासंग्रह

  • admin