शुभ्र - तिमिर मोहक - वसना

By admin, 29 December, 2023

शुभ्र - तिमिर मोहक - वसना । मर्मर-रव-चर्चित - नयना
संथ तरल येई रजनी | विश्वांतुन जपुनी जपुनी;
मंद मंद ज्योतिःकणही । खोवुनिया मुकुटीं पाही,
पापणीत टिपुनी घेई । क्षण-कणिका ओल्या कांही;
सावरीत कचभारातें । वेचित ये मंगल हातें
जीवांचे हलके झेले। जागृतांत अंथरलेले.
सुन्न इथे झाली इवली । फुलमाया विश्वामधली;
जगतांना थोडी थकली । चांदण्यांत थोडी हसली,
स्वप्नाविण आता निजली । शीर्णपर्ण वैभवशाली;
रोमरंध्र शिणुनी गेले | अलवालीं शैवल थिजलें.
उमलतील कलिका दुसऱ्या | खेळतील निर्भय टिपऱ्या;
सांगतील झाली जागी। फुलमाया अन्य, अभागी !

जगण्याचा असला सवदा । मरणांतच काढी कशिदा;
श्वासाला एकच ऐट । किनखापी रजनी-भेट !

कवितासंग्रह

  • admin