कांही कविता

कवितासंग्रह : कांही कविता

By admin, 29 December, 2023

धवल धुक्याच्या संथ बटांची
ल्याली मलमल किती घरें हीं;
अहंपणाच्या उद्दामाची
व्यालीं दद्दल किती मनें हीं !

लाज घराची गवंड्यास ना;
इमारतींचा ईश्वर वाली !
लाज मनाची ईश्वरास ना;
दल्दल राखी फक्त मवाली !

धुक्यांत मल्मल काळी व्याले
किती मवाली इमलेवाले.

पंचगव्य-शर अखिल जगाचे.

दात विचकुनी गेली रात्र;
सूर्य पाहतो जरा चकाणा;
मच्छरदाणीवरी बांधुनी
छप्पर गेला कोण शहाणा !

उजाडतांना झाड थांबलें
चालायाचें अचानकच कां ?
दोन पाय हा असून बेटा
सरळ चालतो, मौज नव्हे का !

By admin, 29 December, 2023

फलाटदादा, फलाटदादा,
येते गाडी, जाते गाडी;
फलाटदादा, आली ही-
पण
शिंगल पडला, गेली गाडी !

हिम्मत तुमची खरी पहाडी,
फलाटदादा, फलाटदादा;
कितीक गेला गडी तुडवुनी
छातीवरती तुमांस समदा !

फलाटदादा, फलाटदादा,
येते गाडी, जाते गाडी;
फलाटदादा, आली ही-
पण
शिंगल पडला, गेली गाडी !

By admin, 29 December, 2023

पळापळांतिल जोर मन्गटीं
घेउन तोडी स्मृती पाकळ्या;
जळाजळांतिल पीळ उकलतां
तळ्यांत दिसती किती सावल्या.

मिटल्या नयनी स्वर्गहि बहरे :
अजाणत्याची निर्भय होडी !
फसला मासा पाहत राही
प्रतिबिंबांची अनंत कोडीं !

पाकळ्यांतला साखळदंड
जखडुन टाकी आनंदाला;
प्रतिबिंबांतिल लवचिक सृष्टी
घेरुन घेई प्रतिष्ठिताला !

By admin, 29 December, 2023

बाळगुनी हा पोटी इवला
गोळा, हसशी प्रसन्नतेने;
साकारुन दे निराकृतीला
विरूपता तव तन्मयतेने.

रसद्रव्यांचे ओढे-नाले
तब रक्ताच्या गंगेलागीं
कितीक मिळती झुळझुळ, इवले
अवयव उगवित इवल्या अंगी.

अशीच हसशिल 'सुटका' होतां;
प्रसन्नता मग जरा निराळी;
रसद्रव्यांचे ओढे-नाले
वळणे घेतिल जरा वेगळी !

By admin, 29 December, 2023

काळ मारुनी गेला टपली
न कळत;
डोक्यावरती तुळई
उदात्ततेची खुदकन हसली,
जणु दरियामधि धोका-समई.
विचार देई दीर्घ जांभई,
आगगाडीमधि जैसें अर्भक;
खुदकन हसली उदात्त तुळई
पाहुनिया तुळतुळीत मस्तक.

केसांमागुन केस गळाले;
खाजवुनी का जातें टक्कल !
जीवामागुन जीव चालले;
तिळतिळ तुटुनिहि येइ न अक्कल.

By admin, 29 December, 2023

रखड रखड रखड जरी फाटते तुमान
ठिगळाविण वसन इथे नंच नभासमान ॥ ध्रु० ||

स्नायूंचा पीळ तुटे
घामाचें पेत्र फुटे;
फुरसत नच लाज तरी वाटण्या जवान |

पोटांतिल स्निग्ध भाव
नैसर्गिक ज्यां न वाव,
वितळतील विष्ठेमधि; आपणां तमा न ॥

मरणाची कळ न फार;
तंग असे जर विजार
शब्दांची आशयास, राख तर इमान ॥

By admin, 29 December, 2023

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

होता होतां राहुन गेले
तारुण्यांतिल दाणे मोती;
जगतां जगतां मरून गेले
बागुलबोवे शेतावरती.

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

वडारणीच्या मुलें लागली
पाठंगुळिला दिवसाढवळ्या;
खुज्या मनांतिल रुळांवरती
वळवळती कृमि आणिक आळ्या !

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

उंबरठ्यावर पिवळा हत्ती
भरला चिंध्यांनी अलबेला
पिंगटलेले सताड भोंदू
त्यास दाविती दोंद-तबेला

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

By admin, 29 December, 2023

होतें आभाळ पेंगत,
सूर्यगोल रेंगाळला;
जैसा इच्छेच्या गल्लीत
श्वान आशेचा भुकेला.

कुणी ओरडलें कोठे
"-बाई, भिकाऱ्याला घाला";
जैसा सत्याच्या निशेत
ब्रह्मचारी करी चाळा.

सूर्य धावला अंधारीं,
जाग आली आभाळाला;
कुणी कुठल्याशा दारी
उष्ट्या महाग अन्नाला !

By admin, 29 December, 2023

आकसली बघ जिवंतता ती
या वृद्धेच्या वदनावरती;
अन् सलतेही माझ्या चित्तीं
‘आज-काल’ची जणु चिनीमाती

By admin, 29 December, 2023

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण
ओठांवरती ओठ मिळाले
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देऊन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेऊन.

जगायची पण सक्ती आहे
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळे
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी !
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले ! न्हाले !

  • admin