होतें आभाळ पेंगत,
सूर्यगोल रेंगाळला;
जैसा इच्छेच्या गल्लीत
श्वान आशेचा भुकेला.
कुणी ओरडलें कोठे
"-बाई, भिकाऱ्याला घाला";
जैसा सत्याच्या निशेत
ब्रह्मचारी करी चाळा.
सूर्य धावला अंधारीं,
जाग आली आभाळाला;
कुणी कुठल्याशा दारी
उष्ट्या महाग अन्नाला !