धवल धुक्याच्या संथ बटांची

By admin, 29 December, 2023

धवल धुक्याच्या संथ बटांची
ल्याली मलमल किती घरें हीं;
अहंपणाच्या उद्दामाची
व्यालीं दद्दल किती मनें हीं !

लाज घराची गवंड्यास ना;
इमारतींचा ईश्वर वाली !
लाज मनाची ईश्वरास ना;
दल्दल राखी फक्त मवाली !

धुक्यांत मल्मल काळी व्याले
किती मवाली इमलेवाले.

पंचगव्य-शर अखिल जगाचे.

दात विचकुनी गेली रात्र;
सूर्य पाहतो जरा चकाणा;
मच्छरदाणीवरी बांधुनी
छप्पर गेला कोण शहाणा !

उजाडतांना झाड थांबलें
चालायाचें अचानकच कां ?
दोन पाय हा असून बेटा
सरळ चालतो, मौज नव्हे का !

दावितात हीं कुणा धुराडीं
तिरपी घालुनि टोपी, वचका ?
कुठल्या, कोणी, कुणास दिधल्या
सांजवातिला आणाभाका !

जरा पिळावें अंबुस अंग;
पिळोख्यातुनी गळेल शीण;
उंच-सखल ही जमीन, पाय
जरा पाहूनी ठेवावा पण.

रित्या मनांतिल भकासतेला
होते चिलखत वीज-दिव्यांचे;
तेंही गेले म्हणून का हे
पंचशव्यगर खजिल जगाचे !

कवितासंग्रह

  • admin