पळापळांतिल जोर मन्गटीं
घेउन तोडी स्मृती पाकळ्या;
जळाजळांतिल पीळ उकलतां
तळ्यांत दिसती किती सावल्या.
मिटल्या नयनी स्वर्गहि बहरे :
अजाणत्याची निर्भय होडी !
फसला मासा पाहत राही
प्रतिबिंबांची अनंत कोडीं !
पाकळ्यांतला साखळदंड
जखडुन टाकी आनंदाला;
प्रतिबिंबांतिल लवचिक सृष्टी
घेरुन घेई प्रतिष्ठिताला !