फलाटदादा, फलाटदादा

By admin, 29 December, 2023

फलाटदादा, फलाटदादा,
येते गाडी, जाते गाडी;
फलाटदादा, आली ही-
पण
शिंगल पडला, गेली गाडी !

हिम्मत तुमची खरी पहाडी,
फलाटदादा, फलाटदादा;
कितीक गेला गडी तुडवुनी
छातीवरती तुमांस समदा !

फलाटदादा, फलाटदादा,
येते गाडी, जाते गाडी;
फलाटदादा, आली ही-
पण
शिंगल पडला, गेली गाडी !

फलाटदादा, इंजनवाली
पसंद पहिली भपकेदार ?
का आता ही विलेक्ट्रिकीची
नकटी नागिण तल्लख-तार ?
किति पायांची छोट्या-मोठ्या
मऊ चामडी गेलां हुंगुन;
किती बुटांच्या ठोकर टाचा
फलाटदादा, गेलां पचवुन !
सपाट, नाजुक, नखरेबाज
बिलगुन गेल्या किती चंपल्या;
किती रांगडी ठसकेदार
वहाण गेली दावित टिकल्या !

फलाटदादा, बोला वो तुमि !
आली गाडी, गेली गाडी;
परी न हसलां, अथवा रडलां,
रामरामचा फुफाट हर्घडी !

किती बावटेवाले दादा
मुछीदार अन् मुछीबगर बी;
हमाल-पोर्टर निळेतांबडे
तुमी पाहिले हर्जजबाबी !

पचक् पान ह्यो कुनी थुंकले;
कुनि मायेचे निरोप दिधले;
विडि-माचिस् कुनि इकीत फिरले;
विलायती कुनि मुके घेतले !
हर् गार्डाची न्यारी शिट्टी;
हर ड्रायव्हरचा न्यारा हात;
तुमांस दादा, ठाउक आहे
पर् समद्यांची बारिक बात !

बोला वो तुमि, बोला वो तुमि,
फलाटदादा, आली गाडी;
उरांत गुपितें कितीक तुमच्या !
बोला वो तुमि !
गेली गाडी !

किति तोऱ्याने ऐटबाज अन्
दिमाख दावित, घेत सलामी,
‘थ्रू’ गाडी ही येई-जाई
झगाळ, जनु की रानीवानी !
मनांत ठसली फलाटदादा,
झोकदार ही पल्लेवाली ?

फटाकडी वा ‘लोकल’ गाडी
चटकचांदणी थिल्लर पटली ?
लटांबराची गबाळ संथ
मालगाडि का बोलघेवडी
बरी वाटली ऐसपैसशी,
घरलक्षुमि जनु यडीभाबडी !

फलाटदादा, बोला, बोला !
मिस्किल शिंगल हिरवा झाला;
गेली गाडी :
फलाटदादा,
आता तरि वो बोला, बोला !

मिस्किल शिंगल, भोळा सांधा;
सीधे रूळ नि खडी गोमटी;
कुरूप काळी पाठ लावतां,
ज्या जीवाला धरिलें पोटीं,
ह्या समद्यांच्या गोष्टी सांगा;
फलाटदादा, आली गाडी;
बोला वो तुमि ! पाठ टेकतों.
शिंगल पडला :
गेली गाडी.

फलाटदादा,
फलाटदादा,
बोला वो तुमि;
गेली गाडी :
बोला वो तुमि !
फलाटदादा,
फलाटदादा....!

कवितासंग्रह

  • admin