"पोपटपंची चतुर्कि जान् पढो पार्वती शिरि भगवान्."

By admin, 29 December, 2023

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

होता होतां राहुन गेले
तारुण्यांतिल दाणे मोती;
जगतां जगतां मरून गेले
बागुलबोवे शेतावरती.

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

वडारणीच्या मुलें लागली
पाठंगुळिला दिवसाढवळ्या;
खुज्या मनांतिल रुळांवरती
वळवळती कृमि आणिक आळ्या !

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

उंबरठ्यावर पिवळा हत्ती
भरला चिंध्यांनी अलबेला
पिंगटलेले सताड भोंदू
त्यास दाविती दोंद-तबेला

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

वडारणीचा बागुलबोवा
जुळवित बसला पिंगट हत्ती
येतां येतां ठिपकत आळ्या
रचीत बसल्या दोंद-प्रशस्ती

"पोपटपंची चतुर्कि जान्
पढो पार्वती शिरि भगवान्."

कवितासंग्रह

  • admin