दोन खोल्यांच्या बिऱ्हाडीं । माझ्या घरी मी वऱ्हाडी
किंवा सासरी कऱ्हाडी । जामात की ॥
कष्ट होता चढे पारा । नाही क्विनीन उतारा;
अंगा झोंबे खारा वारा । अदृश्याचा ॥
येतां देवळाचा लांबुनी। घंटानाद जाई आंबुनी;
त्या घेतां भावना-भाजनीं । अश्रु फाटे ॥
किडली काळोखाची फळें । रात्रपाळी यंत्रांमुळे;
चाखतां भाव-यकृत् पिगळे । विषम ज्वरें ॥
रात्र-पापणीचे केस । तेच तारा-रश्मि-वेष;
परि निद्रेचें साहस | करवेना ! ॥