जे अज्ञानांत जन्मले । आणि अज्ञानांत मेले,
त्यांस देवा तूं धरिलें । काय पोटीं ? ॥
का झालासी निष्ठुर ? | दिलें तयांसी अंतर
जन्ममरणाही नंतर । विश्वगर्भीं ॥
देह साफल्य पावले | पृथ्वीवरी त्यांचें भलें;
आलें काम त्यांनी केलें । आणि गेले ॥
गळे अश्रूंवीण चरबी । तीच अज्ञानाची छबी;
झाले ते खत आणि बीं । तुझ्या मळां ॥
आम्ही ज्ञानवंत भागलों । ना पश्चात्तापें पोळलों;
नाहीं कधी हळहळलों । परदुःखें ॥
वेचिलें ज्ञान कण कण | जैसे की वालुका-गण;
झालों कोरडे पाषाण । बुद्धिरूपी ॥
आमुची संज्ञा ही दरड । रखरखीत देहापाड,
वरी अहंतेचा पहाड । लागलासे ॥
होतां तप्त ही जमीन । नाही अश्रू, नाही घाम;
वांझपोटीस इनाम । रूक्ष काया ! ॥