१९४७

प्रकाशनवर्ष

By admin, 29 December, 2023

मस्तली इच्छेची काया । ईर्ष्या, अहंता, असूया
बोचती, जैशा की सुया । इंजेक्शनीं ॥

इंजेक्शनें वाढे शक्ती । इंजेक्शनें जाई भीती;
इंजेक्शनें लठ्ठ होती । बुद्धि-स्नायू ॥

इंजेक्शनें पैसा मिळे । आणि पारंब्या तैशीं मुळे
रोगी-डाक्तरांचीही कुळें । पोसतात ॥

झाली इच्छा ऐशी पुष्ट । आता ओढवे अरिष्ट;
कैसे निवडावें इष्ट । उद्दिष्ट तें ॥

अंधारलें अंतर्याम । दिला जेव्हा क्लोरोफार्म;
शक्ति असूनही वर्म । निपचित ॥

अंगी कुडतें-धोतर । आणि डोक्यावरी छप्पर,
भिंतीपल्याड वावर । डाक्तरांचा ॥

By admin, 29 December, 2023

सकाळी उठोनी । चहा-कॉफी घ्यावी,
तशीच गाठावी । वीज-गाडी ॥

दाती तृण घ्यावें । ‘हुजूर’ म्हणून;
दुपारी भोजन । हेंची सार्थ ॥

संध्याकाळ होतां । भूक लागे तरी,
पोरांबाळांवरी । ओकूं नये ॥

निद्रेच्या खोपटीं । काळजीची बिळें;
होणार वाटोळें । होईल तें ॥

कुणाच्या पायाचा । कांही असो गुण
आपुली आपण । विडी प्यावी ॥

जेथे निधे धूर । तेथे आहे अग्नी;
आम्ही जमदग्री । प्रेतरूपी ॥

By admin, 29 December, 2023

आहे रक्तांत उजाळा । सूक्ष्मदर्शी चष्मा डोळां;
नाही बुद्धीचा पांगळा | मानव मी ॥

पंगू लंघे हिमगिरी । नाव चाले जलोदरी;
जीव पैशाला पासरी । अणु-युगीं ॥

जये केली ऐशी कृपा । नांव माधवाचें जपा,
म्हणा, ' तमहं वंदे' पां । ब्रह्मानंदा ॥

स्वार्थ बोले ओठींओठीं । सत्ता बैसे पैशापाठीं;
येरागबाळांच्या गाठीं । अर्धपोट ॥

फिर्वा फिर्वा रे दांडी । आणि मारा ही गचांडी
‘वंदे तमहम्' ब्रह्मांडीं । बरा नाद ॥

By admin, 29 December, 2023

केला थोडा रोजगार । आणि अन्नाचा विचार;
आता शेवटी लाचार । माझा मीच ॥

दृष्टी पडे जेथे जेथे । तेथे अंधत्वाचे काटे;
झालें ज्ञान उफराटें। कुंपण की ॥

हें का टेबल ? ही खुर्ची ? । नाकीं झोंबे ही का मिर्ची ?
मग आभासाची बर्ची । मारिती कां ? ॥

आहें विज्ञान-महंत । आणि भावनेने संत;
जन्ममृत्यूची ना खंत । टळे परि ॥

आज पाहिलें मरण । गेळा भांबावून प्राण;
माझ्या ज्ञानाचें कुंपण । स्मशानांत ॥

लावा दुर्बिण आकाशीं । फोडा परमाणु-राशी;
आम्ही अधाशी ! उपाशी । आम्हां नेणें ॥

जातां मायेची माउली । केली बापाने सावली;
आता बहीण-बाइलीं। धीर दिला ॥

By admin, 29 December, 2023

आग अंधाराची जीवा । कोण्या देवाने लावली !
गेल्या जन्मीचीं पातकें | फळा आली ॥

मंत्रजागर यंत्राचा । फोडी वाचा अंधाराला;
हंबरून गाय गेली । वासराला ॥

काष्ठ झालेल्या हो मनीं । जळीं, स्थळीं नि पाषाणीं,
सांगा पाहिला का कधी । देव कुणीं ॥

सांगूं कोणां तत्त्वज्ञान । पान पान जाळी झालें;
गेल्या वर्षीच पोथीत । किडे व्याले ॥

केला उदंड विचार । आणि आहुतीची चर्चा;
आता घ्यावी वैश्वानरा । पूजाअर्चा ॥

कोत्या मनांतलीं भुतें । हींच द्रोणांतलीं शितें;
मात्र ओशटली बोटें । आशाघृतें ॥

By admin, 29 December, 2023

जे न जन्मले वा मेले । त्यांसी म्हणे जो आपुले,
तोचि मुत्सद्दी जाणावा । देव तेथे ओळखावा ॥
मोलें धाडी जो मराया । नाही आसूं आणि माया
त्यासी नेता बनवावें । आम्हा मेंढरांस ठावे ॥

By admin, 29 December, 2023

आरामाचा राम । वदावा निष्काम
खंदकांत पण । विसरावा ॥

खंदकांत ओल्या । दारुगोळ्याचा रे
नाही नारायण । कदापीही ॥

कोरडी ठेवावी। दारू सर्व काळ
ओठावर माळ | हुकुमांची ॥

पायाची वहाण | पायांत ठेवावी
चित्तीं असू द्यावी । मद्यभ्रांती ||

अज्ञानी जनांस । ज्ञान पाजू नये
मरूनी उरावें । धडरूपें ॥

दे गा हेचि दान । देवा, माझी हाडें
खाउनी गिधाडे। तृप्त व्हावीं ॥

By admin, 29 December, 2023

प्रेमाचें लव्हाळें,
सौंदर्य नव्हाळें,
शोधूं ?
-आसपास
मुडद्यांची रास;
यंत्रांतून आग;
गोळ्यांचे पराग;
विमानाचे हल्ले,
बेचिराख जिल्हे;
रक्ताचीं थारोळीं;
अपंग आरोळी;
बेभानले मन
रोखतां संगीन;
विटली ही काया.
देशावर माया
कुणाच्या ? कोणाची ?
पडत्या फळाची
आज्ञा होतां वीर
हातीं घेई शीर
कुणाचें ? कशाला ?
-भाकरी पोटाला !!

आम्हा भाग्यवंतां
क्षमस्व अहंता;
आमुचें मरण
-आम्हीच जळण-
पाहिलें या डोळां !
विश्वंभर भोळा
सडवी पाचोळा
फुलविण्या ज्वाळा !

By admin, 17 December, 2023

माझा अभंग माझी ओवी। नतद्रष्ट गाथा गोवी,
इंजिनावीण गाडी जेवी। घरंगळे॥

कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ। कुठे तुकाराम पवित्र,
कुठे समर्थ धीरोदात्त। संत सर्व॥

संत शब्दांचे नायक। संत अर्थाचे धुरंधर;
एक शब्दांचा किंकर। डफ्फर मी॥

ज्ञान-विज्ञानी उमाळा। सत्ता मारी तिर्पा डोळा,
सोन्या चांदीचा सोहळा। आततायी॥

ऐशा टापूत चौफेर। नाही माहेर-सासर;
कैंचे गोत्र वा प्रवर। अनामिका॥

नेणें बिजली वा पणती। स्थिर आहे तरी दृष्टी;
आपद्धर्में नाही कष्टी। बावळा मी॥

परि फाटे हे अंतर। आणि जन्मा येई अंबर!
तोडा नाळ अवडंबर। नारायणा॥

  • admin