प्रेमाचें लव्हाळें,
सौंदर्य नव्हाळें,
शोधूं ?
-आसपास
मुडद्यांची रास;
यंत्रांतून आग;
गोळ्यांचे पराग;
विमानाचे हल्ले,
बेचिराख जिल्हे;
रक्ताचीं थारोळीं;
अपंग आरोळी;
बेभानले मन
रोखतां संगीन;
विटली ही काया.
देशावर माया
कुणाच्या ? कोणाची ?
पडत्या फळाची
आज्ञा होतां वीर
हातीं घेई शीर
कुणाचें ? कशाला ?
-भाकरी पोटाला !!
आम्हा भाग्यवंतां
क्षमस्व अहंता;
आमुचें मरण
-आम्हीच जळण-
पाहिलें या डोळां !
विश्वंभर भोळा
सडवी पाचोळा
फुलविण्या ज्वाळा !
पृथ्वीची तिरडी
(एरव्ही परडी
फुलांनी भरली !)
जळो देवा, भली !!