केला थोडा रोजगार । आणि अन्नाचा विचार;
आता शेवटी लाचार । माझा मीच ॥
दृष्टी पडे जेथे जेथे । तेथे अंधत्वाचे काटे;
झालें ज्ञान उफराटें। कुंपण की ॥
हें का टेबल ? ही खुर्ची ? । नाकीं झोंबे ही का मिर्ची ?
मग आभासाची बर्ची । मारिती कां ? ॥
आहें विज्ञान-महंत । आणि भावनेने संत;
जन्ममृत्यूची ना खंत । टळे परि ॥
आज पाहिलें मरण । गेळा भांबावून प्राण;
माझ्या ज्ञानाचें कुंपण । स्मशानांत ॥
लावा दुर्बिण आकाशीं । फोडा परमाणु-राशी;
आम्ही अधाशी ! उपाशी । आम्हां नेणें ॥
जातां मायेची माउली । केली बापाने सावली;
आता बहीण-बाइलीं। धीर दिला ॥
हींहि जातील गा देवा । मग सर्वांचा सुगावा
कैसा कैसा रे लागावा । आंधळ्याला ! ॥