आग अंधाराची जीवा । कोण्या देवाने लावली !

By admin, 29 December, 2023

आग अंधाराची जीवा । कोण्या देवाने लावली !
गेल्या जन्मीचीं पातकें | फळा आली ॥

मंत्रजागर यंत्राचा । फोडी वाचा अंधाराला;
हंबरून गाय गेली । वासराला ॥

काष्ठ झालेल्या हो मनीं । जळीं, स्थळीं नि पाषाणीं,
सांगा पाहिला का कधी । देव कुणीं ॥

सांगूं कोणां तत्त्वज्ञान । पान पान जाळी झालें;
गेल्या वर्षीच पोथीत । किडे व्याले ॥

केला उदंड विचार । आणि आहुतीची चर्चा;
आता घ्यावी वैश्वानरा । पूजाअर्चा ॥

कोत्या मनांतलीं भुतें । हींच द्रोणांतलीं शितें;
मात्र ओशटली बोटें । आशाघृतें ॥

केली अंधारांत सेवा । नाही उमगला घाट;
परि आतां कृपावंता । द्या हो वाट ॥

उद्या येईन माघारी | उद्या पाऊस-पाडवा;
आम्हा सज्जनांसी कैंचा । हेवादावा ! ॥

कवितासंग्रह

  • admin