माझा अभंग माझी ओवी

By admin, 17 December, 2023

माझा अभंग माझी ओवी। नतद्रष्ट गाथा गोवी,
इंजिनावीण गाडी जेवी। घरंगळे॥

कुठे ज्ञानेश्वर श्रेष्ठ। कुठे तुकाराम पवित्र,
कुठे समर्थ धीरोदात्त। संत सर्व॥

संत शब्दांचे नायक। संत अर्थाचे धुरंधर;
एक शब्दांचा किंकर। डफ्फर मी॥

ज्ञान-विज्ञानी उमाळा। सत्ता मारी तिर्पा डोळा,
सोन्या चांदीचा सोहळा। आततायी॥

ऐशा टापूत चौफेर। नाही माहेर-सासर;
कैंचे गोत्र वा प्रवर। अनामिका॥

नेणें बिजली वा पणती। स्थिर आहे तरी दृष्टी;
आपद्धर्में नाही कष्टी। बावळा मी॥

परि फाटे हे अंतर। आणि जन्मा येई अंबर!
तोडा नाळ अवडंबर। नारायणा॥

अहो शब्दराजे, ऐका। लाज सेवकाची राखा;
नाही तरी वरती काखा। आहेत या॥

कवितासंग्रह

  • admin