वावडी वाह्यात माझी ! पोकळीचा पिंजरा !
सोड दोरी, जाउं दे ह्या कागदाच्या पाखरा !
ओळखीच्या द्या ढगांचा रंग गेला गंजुनी,
ओतलेल्या ह्या नसांचा ढंग तेवी पिंजुनी
देठ-बेंबीचा कुठे का सांधतो फांदी-फुलां !
गेंद येतो तारकांचा आवसेच्या रात्रिला.
फाळ भंगे नांगराचा, शेत ओकी ढेकळां,
आणि माझ्या मायबापा, तूंहि खुपशी या गळां.
कातणीच्या जेवि पोटीं लक्ष अंडी पोसती,
पोकळीच्या आत तेवी लाख वाती तेवती.
टाळुनीया त्यांस जाण्या आकसे ही वावडी,
सोड दोरी देवबाप्पा; वाळली हीं आतडी
सोड दोरी, जाउं दे रे !काळ लोम्बई या घडीं.