मन वाचनिं आज ना रमे; स्मृति होते तत्र एकसारखी;
हुरहूर भरून ये हृदीं; भर संख्या करि त्यांत आणखी.
बसलों म्हणुनीच येउनी —जग-कोलाहल लांब मागुती
दगडावर याच, ज्यावरी गतकाळी तव स्निग्ध संगती.
पसरे लहरीत वायुच्या मधु छायार्णव सांध्य भोवती;
निमिषांत नभावरी निळ्या किति नानाविध रंग फाकती.
अति संथ समीर-गारवा सुटुनी वाटसरास सांगतो,
“जरि घाट कितीहि चालला, नच आता तरि अध्व-खेद तो.”
विहरून नभांत स्वैरसें घरट्याला निज शेवटी त्वरें,
चिंवचींवीत सांज-माधुरी बघ हीं जात सुखांत पाखरें,
मिटणार फुलाफुलांतुनी, प्रतिपानावर कंप पावुनीं,
लहरीलहरींतुनी जलीं, प्रतिमेघावर गोड रंगुनी,
श्रुतिशांत दिनांत-गीत ये श्रवणीं, “श्रांत जिवा विसाव घे!”
मज हाय कुठे न आसरा; करिती पारध हे विचार गे.
हळुवार सुहास, रात्र ही मखमाली पसरीत हात ये;
अपघात घडून देह हा पडला एक रुळावरी इथे,
बघुनी क्षण शांति मन्मनीं न कळे कां परि खास वाटली,
कुठुनी तरि शक्ति;.........