झाली चूक ! —क्षमस्व ! वेड असलें जन्मांतुनी लागतें,
तेंही एकच वेळ ! नेत्र उघडे ठेवून ना दोनदा :
मौर्ख्याचा जगणें कलंक न असा लावून घेतां कदा,
सर्वांनाच कुठे शहाणपण हे देवाघरीं लाभतें !
ज्यांना संकट, दुःख, भीति अथवा चिंता, निराशाच ना,
ज्यांचे खोल न जीवनानुभव गे, ज्यां भावना वावडी,
टक्के वा नच टोणपे पचविले, —प्रज्ञा तयांची बडी !!—
त्यांनी योग्यच हासणें, हिणविणें, संतप्त कष्टी जनां.
बेमालूमपणें बनावट अशा नाण्यांतुनी संपदा
घ्यावी साठवुनी अचूक ! —शिकलों नाहीं परी ही कला.
घामाने भरलें कपाळ, —सुकली ही जीभ ! —शोधी जला
आशेने, हळु ओठ लागति जरी शेवाळल्या फत्तरा !
प्रीतीची नच आच ! —सावधपणे सांभाळणे कातडी,
सर्वांनाच अशी करामत कुठे ! —जाती जळूनी मढी.