जा जाई आता, परतुनि कां हाससी ?

By admin, 30 December, 2023

जा जाई आता, परतुनि कां हाससी ?
कां उगाच वळवुनि मागे
आपुली नजर, भारिसी !

स्थितधी न जरी मी, मानी तरि मानिनी,
नच अवाक्षराही एका
काढीन कधी नाणी.

ये वीणारव मधु, मंजुळ पवनांतुनी,
डबडबती ऐकुनि डोळे
कारुण्य-सुधा-सिंचनीं.

परि एकहि भोळा अश्रू जो तेथुनी
पडणार, तोंच घेईल
हृदयाग्नि तया शोषुनी.

धगधगत निखारा हृदयीं हा कोंदुनी,
मत्प्रसन्नवदनीं छाया
वरि शीतल चंद्राहुनी.

ही पाझरते तव शांत शरच्चंद्रिका !
निशिगंध दरवळे भोती,
पुलकिता मार्ग-वालुका.

अदृश्य अप्सरा अवनीवर येउनी,
घुमविती निशा-संगीत
या मिटल्या पुष्पांतुनी.

मी मानव ! —दुर्बळ ! —दिव्य, धवल माधुरी !
व्याकळून हृदयीं येतां
स्मृति होइल तव अंतरीं.

हृत्कंप ! —तरल भावना ! गोड ती स्मृती !
परि निष्ठुर जरबेने मी
गाडीन गाढ विस्मृतीं.

बंबाळ जखम आतली दाबतों अशी,
बेहिम्मत आर्तरवाने
रडतील रडो दीनशी.

निष्प्रेम-निराशा - दुःसह जीवन तरी,
याचना न केविलवाणी
मम वदेल कधि वैखरी.

कवितासंग्रह

  • admin