मायावी गुजगोष्टि गुल्गुल् मुदें

By admin, 30 December, 2023

मायावी गुजगोष्टि गुल्गुल् मुदें; आलिंगनीं तत्पर;
किंवा चुंबनलोलुप स्मित सदा ओठांवरी नाचरें!
झालीं दंग सुहास, प्रेम-युगुलें ऐशीं मजेखातर;
-विश्वाच्या बगिच्यांत हीं भिरकिती कालांबरी पाखरें.
हासे ज्यां क्षणभंगुरत्व विजयें वाखाणुनी कौतुकें,
लीला या लटक्या बघून निमिषोत्पुल्ला सुदैवानिलें;
माझेंही तुज प्रेम काय गमलें या टर्फलांसारिखें,
ज्यांच्यांतील जिवंत जीवनरसा सौख्यें असे शोषिलें ?
नाही - ! मद्हृदयीं सुरा खुपसतां मी आत्महत्येस्तव,
रक्ताची चिळकांड ही उसळुनी एका कमानींतुन
येवोनी भिजवील कोमल तशा या शुभ्र पायां तव;
अन् तो स्रोत अखंड वाहिल तसा दिक्काल ओलांडुन.

घेतां आचमुनी पवित्र जहरी ही रक्तगंगा लव,
विश्वाचे अभिषिक्त देव तरुनी होतील ते - मानव.

कवितासंग्रह

  • admin