हां हां थांब ! नको सुहास, गमवू तोंडांतली मौक्तिकें,
"देवाच्या घरचाच न्याय असला !" प्रश्नास दे उत्तर.
"झाला खेळ, अता पुरे!" वद असे धिक्कारुनी कौतुकें,
जातांना उपहास हास्य-ध्वनिही पाडीत कानांवर.
काळी भीषण रात्र कापित निघे हृत्स्वामिनी भेटण्या
काळा फत्तर तोंच होउनि पडे तारा सहाऱ्यावर.
स्वर्गाच्या मग मंदिरी चमकती जेव्हा सख्या चांदण्या,
किंचित् हासुनि तारका खुणविते-"आता कळे अंतर!"
झाला अंक समाप्त एक ! बदले ही भूमिका, वेष हा;
मी रस्त्यांतिल गे भिकार कवि, तूं प्रासादशृंगी रहा!