गुलाब, जाई फुललेली

By admin, 30 December, 2023

गुलाब, जाई फुललेली । वाऱ्यावर करिती केली;
हास गडे त्यांच्यासंगें । सुमहृदया माला तूं गे;
नयनामधि निर्मल पाणी । सस्मित मधु अधरीं गाणी;
गात गात आनंदूनी । नंदनवन बनवी अवनी.

मिटलेल्या कोमल कलिका । पानांमधि लपवी लतिका;
एकेकिस शोधुनि काढी । चुंबुनि ती फुलवी वेडी,
- हात नका लावू कुणिही । कोमेजुन जातिल बाई;
शब्द नका काढू कुणिही । लपविल ही नाजुक जाई.

सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती;
मंद गंधभवती भरती । पानपुष्प पुलकित करिती.
वर्षांच्या मागुनि वर्षे । जातिल तरि विसरुनि हर्षे;
पाहत तुज राहिन ऐसा । आनंदित वेडा जैसा.

चकित परी तन्मयता ही । प्रश्न करी आश्चर्ये की,
स्वर्गांतिल सौंदर्याला । बहर कसा भूवर आला !

कवितासंग्रह

  • admin