माळावरच्या बांधावरती विलोलनयना जरा
यांवली कटी ठेवुनी करा.
पश्चिमभागी बाल कुणितरी देवदूत चिमुकला
चितारित मेघावलि रंगला.
नीलकाशी शुभ्र कापसी खवल्यांवर जांभळी
झाक ही हलक्या हातें दिली.
डोक्याखाली अफाट माळहि थेट पुढे लागला,
तयावर आम्रवृक्ष एकला
मोहर भरला, चूतमंजिरी उन्मादक परिमला
पसरवी लोभविण्या गे तुला.
चरतां चरतां दूर पांगल्या गाई कुरणावरी
चालल्या ओढ्याकाठुन घरी.
नजर नाचरी नागसुंदरी विलासिनी रोखुनी,
झरझरा जातांना हासुनी
गालावरच्या गोड खळीने शराब की सांडली
मुशाफिर-तृषा तिने भागली.